जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर येथे लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मंगळवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू आणि काश्मीर पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलांकडून परिसरात आणखी शोध मोहीम सुरू असल्याचे जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) जोगिंदर सिंग यांनी सांगितले.

अखनूरमध्ये दहशतवादी लपले असून त्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली. लष्कर, पोलीस, एसओजी आणि निमलष्करी दलांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले, असे सिंग म्हणाले.

बट्टल परिसरात 28 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांकडून दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केला. या हल्ल्याला सुरक्षा दलाकडून त्वरीत प्रत्युत्तर देण्यात आले. सदर परिसर त्वरीत सील करण्यात आला असून शोध मोहीम सुरू आहे.