चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान मारले गेले तर दोन पोर्टरचा मृत्यू झाला. त्यानंतर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोधमोहीम राबवत सुरक्षा दलाच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तब्बल पाच तास चकमक सुरू होती. यातील एका दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आज सकाळी साडेसातच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ भट्टल परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर अंदाधुंद गोळीबार केला आणि जंगलाच्या दिशेने पसार झाले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. त्यानंतर सुरक्षा दलाने जंगलात शोधमोहीम राबवली आणि तब्बल 5 तासांच्या चकमकीनंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याआधी 24 ऑक्टोबर रोजी बारामुल्ला येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. यात 3 जवान शहीद झाले होते तर 2 पोर्टर्सचा मृत्यू झाला होता.
मोबाईलचा शोध घेत होते दहशतवादी
जंगलातील शिव आसन मंदिरात दहशतवादी एका मोबाईलचा शोध घेत होते, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱयांनी दिली आहे. दहशतवाद्यांना कुणाला तरी कॉल करायचा होता. याचदरम्यान लष्कराची रुग्णवाहिका येथून जात होती. ते पाहून दहशतवाद्यांनी रुग्णवाहिकेवर अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान, दहशतवादी रविवारी रात्रीच बॉर्डर पार करून अखनूर येथे आले होते, अशी माहिती समोर आली आहे.