
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात धावत्या कारने पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. सय्यद शाकिब मोहम्मद असे कारमालकाचे नाव आहे. सय्यद हे आपल्या दोन साथीदारांसोबत गोवंडी येथून मुंबई-नाशिक महामार्गावरून मुंब्याच्या दिशेने जात असताना कालिका माता मंदिराजवळ त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. यावेळी गाडीतून प्रवास करणारे तिघेही वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.