मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस-टेम्पोचा अपघात, 14 जण जखमी; तीन गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खासगी बस आणि टेम्पोच्या अपघातात 14 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. खोपोलीजवळ गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टेम्पोने बसला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. गंभीर जखमींवर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर बस सांगोल्याहून मुंबईकडे येत होती. यादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मागून येणाऱ्या कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक झाला आणि टेम्पो बसला धडकला. टेम्पोची धडक बसल्याने बस अनियंत्रित झाली आणि 20 फूट दरीत कोसळली.

बसमध्ये 11 प्रवाशी होते. सर्व प्रवाशी आणि चालक किरकोळ जखमी झाले. खोपोलीतील सरकारी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. टेम्पोमधील तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.