पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय 3 टप्प्यात घेतला जाईल

पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्यासाठी शुक्रवारी जलशक्ती मंत्रालयाची बैठक झाली. याबाबत 3 टप्प्यात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली. सी.आर. पाटील म्हणाले की, “याबाबत तीन प्रकारच्या रणनीती आखल्या जात आहेत. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जलशक्ती मंत्री सीआर पाटील सहभागी झाले होते. 3 टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या रणनीतींबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 23 एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानला पत्र पाठवून हिंदुस्थानने याबाबत अधिकृत माहिती दिली. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.