इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने तीन जण भाजल्याची घटना मालाडच्या कुरार परिसरात घडली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी ते हद्दीत गस्त करत होते तेव्हा मालाडच्या एका खासगी रुग्णालयातून तीन जण भाजल्याचा पोलिसांना फोन आला. त्यानंतर उपनिरीक्षक रवींद्र जगताप आणि तक्रारदार हे रुग्णालयात गेले.
वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन जण जखमी झाल्याची माहिती दिली. मिकाइल मणियार, सल्लाउद्दीन खान, अफरोज सिद्दिकी हे जखमी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना सांगितले. मिकाइल आणि अफरोजच्या पायाला भाजले गेले होते. सल्लाउद्दीन हे सोमवारी कुरार येथे त्याच्या भावाकडे गेले होते. रात्री उशीर झाल्याने ते भावासोबत त्या दुकानात झोपले होते.
मंगळवारी सकाळी सलाउद्दीन हे झोपेत होते तेव्हा अचानक आवाज आला. दुकानातून बाहेर पळत असताना त्याना पायाला इजा झाल्याचे लक्षात आले. तसेच अफरोज आणि मिकाइलदेखील भाजले गेले होते. मिकाइलच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले, त्याचा भाऊ अहमद सिद्दिकी हा त्याच दुकानात काम करतो. त्याने दुकानात चार्जिंगसाठी लावलेल्या मोटारसायकलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने त्यातील ऑसिड त्या तिघांच्या अंगावर उडाले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तपासादरम्यान पोलिसांनी एक बॅटरी जप्त केली आहे. त्या रात्री अहमदने संपूर्ण रात्र बॅटरी चार्जिंगला लावली होती. घडल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.