कल्याणमधील अजमेरा हाईट्स इमारतीत राहणाऱ्या मराठी देशमुख कुटुंबाला अमराठी अखिलेश शुक्ला कुटुंबाकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनात उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी या मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार हंगामा करून सभागृह डोक्यावर घेतले. त्यांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान, मुजोर शुक्लासह तीन हल्लेखोरांना 36 तासांनंतर पोलिसांनी आज अटक केली.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला अमराठी कुटुंबाकडून झालेल्या मारहाणीचा मुद्दा नियम 289 अन्वये विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने विधान परिषदेत मांडला आणि सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवून या मुद्द्यावर चर्चा केली जावी अशी मागणी केली.
शिवसेनेचे गटनेचे अॅड. अनिल परब यांनी या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला केला. परप्रांतीयांची मुजोरी मुंबई महानगर प्रदेशात वाढत चालली आहे. शुक्ला याने मराठी माणसाचा अपमान केला. लोखंडी रॉडने मारहाण केली. वडिलांचे निधन झाल्याने केस काढलेल्या देशमुख यांना टकल्या म्हणून हिणवले. मी मंत्रालयात काम करतो, तुम्ही मराठी माझे काहीही बिघडवू शकत नाही, तुमच्यासारखी 56 मराठी माणसे माझ्या घरी झाडू मारतात, असे अपमानास्पद वक्तव्य त्याने केल्याचे परब यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
शुक्ला हा एमटीडीसीमध्ये मॅनेजर असल्याचे सांगतो, त्याला या प्रकरणी तातडीने बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी अनिल परब यांनी केली. ही पहिलीच घटना नाही, तर गेल्या तीन महिन्यांत अशा तीन घटना घडल्या आहेत. मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारली गेली. गिरगावमध्ये एका महिलेला मराठीत नाही तर मारवाडीत बोलायचे. कारण आता भाजपचे सरकार आले आहे असे सांगितले गेले. हा सत्तेचा माज आहे. हा मराठीचा अवमान आहे. तो सत्ताधाऱ्यांना मान्य आहे का? असा सडेतोड सवाल अनिल परब यांनी केला.
मंत्री विखे पाटील यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असता विरोधी पक्षाचे सदस्य संतापले. त्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन जोरदार घोषणा दिल्या. ‘मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचा धिक्कार असो’, ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘बडतर्फ करा, बडतर्फ करा, शुक्लाला बडतर्फ करा’, महाराष्ट्रसह मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. प्रचंड गदारोळ झाल्याने सभापती राम शिंदे यांनी सभागृह दहा मिनिटे तहकूब केले.
…यांना ठेचून काढावेच लागेल – सचिन अहिर
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आले. त्या वेळी विरोधकांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या लोकांना कायद्याच्या माध्यमातून ठेचून काढावेच लागेल असे शिवसेना आमदार सचिन अहिर म्हणाले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. त्यामुळे अखिलेश शुक्ला याच्यासारख्या अधिकाऱ्यावर मराठी माणसाची जरब बसलीच पाहिजे, असे काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले.
दंगल होऊ शकते, कठोर कारवाई करा – अनिल परब
आमदार अनिल परब यांनीही अमराठींच्या माजोरड्या प्रवृत्तीवर पुन्हा हल्ला चढवला. मराठी माणसाने काय करायचे, काय खायचे हे बाहेरची माणसे ठरवणार का? जैन बिल्डरांनी मराठी माणसांना घरे देणे बंद केले आहे. मराठी माणसाने मांसाहार करायचा की नाही. लोकलमध्ये गुजराती माणसे मराठी माणसाला चौथी सीटही देत नाहीत, दादागिरी करतात. अशा घटनांमागे उद्याची दंगल लपलेली आहे असे सांगत अनिल परब यांनी याप्रश्नी कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी केली.
गळचेपी सहन करणार नाही – सुनील प्रभू
या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेतही उमटले. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कळविट्टे यांना झालेली मारहाण आणि मराठी माणसाच्या विरोधात ओकलेली गरळ याचा संपूर्ण घटनाक्रम सुनील प्रभू यांनी सभागृहात मांडला तेव्हा सदस्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत ‘शेम’… ‘शेम’च्या घोषणा दिल्या. मराठी माणसाच्या विरोधात गरळ ओकणारा हा शुक्ला कोण आहे असा संतप्त सवाल सुनील प्रभू यांनी केला. या महाराष्ट्रात ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस सहन करणार नाही असा इशारा सुनील प्रभू यांनी इशारा दिला.
कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई
विधानसभेतही तीव्र पडसाद उमटले. घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या महाराष्ट्रात मराठी माणसावर कोणी अन्याय करीत असेल तर सहन करणार नाही. तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मानसन्मान या राज्यात निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीने प्रशासन वागेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
मांसाहारींना घर नाकारल्यास कारवाई, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सभागृहात निवेदन केले. मराठी माणसाला देशमुख कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला सरकारी सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच कोणत्याही परिस्थितीत मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे. त्यामुळे मराठी माणसाशी माजोरडेपणाने वागेल त्याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे सांगतानाच मांसाहारी आहे म्हणून कुणी घर नाकारले तर कारवाई केली जाईल, असे फडणवीसांनी सांगितले.
अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी देशमुख कुटुंबाशी अपमानास्पद वर्तन केले. अखिलेश हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) कर्मचारी आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार त्याच्याविरुद्ध कलम 307 अन्वये कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार का झाला, कुणाच्या काळात झाला याचाही विचार करण्याची यानिमित्ताने गरज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
क्षेत्रीय अस्मिता जपली गेलीच पाहिजे
राष्ट्रीय अस्मितेबरोबर क्षेत्रीय अस्मिताही जपली गेली पाहिजे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही मराठी आहोत आणि त्या अस्मितेवर कुणी घाला घालत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रत्येकाला काय खायचे, कुठे राहायचे याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यात मांसाहार हा प्रामुख्याने केला जातो तसेच देशाच्या काही प्रांतांत शाकाहाराला प्राधान्य दिले जाते, असे उदाहरणही त्यांनी दिले. त्यामुळे आहारानुसार संघटन होते, पण कुणी मांसाहार करतो म्हणून त्याला घर नाकारण्याचा कुणालाही अधिकार नाही. अशा गोष्टी निदर्शनास आल्या तर योग्य ती कारवाई केली जाईल अशा इशारा या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.