पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

अफरोज सिराज पठाण (23), आवेज नवीद पटेल (21), अल्ताफ राजू पटेल (19) (सर्व राहणार शेलगाव, ता. कन्नड) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे तीन तरुण मित्र पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. पाण्यात उड्या घेतल्या. परंतु, पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला असता काही उपयोग झाला नाही. पोलीसपाटील सलीम नवी पटेल यांनी पिशोर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविली. पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वा फरताडे, बीट अंमलदार किरण गंडे यांनी पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.