चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने मलेशियालाही कवटाळले असून आता हिंदुस्थानातही शिरकाव केला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका दोन महिन्यांच्या बाळाला ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले, तर कर्नाटकात तीन महिन्यांची मुलगी आणि आठ महिन्यांच्या मुलाला या विषाणूची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अलर्ट मोडवर गेले असून या विषाणूशी लढण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची लक्षणे आढळल्यास आजार अंगावर काढू नये अन्यथा आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
चाचणी प्रयोगशाळांची संख्या वाढवणार
खबरदारीचा उपाय म्हणून ह्युमन मेटान्यूमो व्हायरस या विषाणूसाठी चाचणी प्रयोगशाळांच्या संख्या वाढवण्यात येणार असल्याचे तसेच या विषाणूशी संबंधित प्रकरणांचे वर्षभर निरीक्षण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
शेअर बाजार गडगडला
एचएमपीव्हीचे साईड इफेक्ट्स आशियातील शेअर बाजारासह चलनावरही जाणवत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची पडझड सुरू झाली. सुरुवातीला सेन्सेक्स 1441 अंकांनी कोसळला. दिवसभरात बाजार सावरला नाही.
राज्यात लवकरच नियमावली
एचएमपीव्ही या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वीही हा व्हायरस आला आहे. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतोय. यासंदर्भात जी नियमावली आहे ती लवकरच जाहीर होईल. आता लगेचच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. माध्यमांना विनंती आहे की, यासंदर्भात कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी. आरोग्य विभागाची बैठका झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राज्य सरकारसोबत बैठक सुरू आहेत. केंद्राच्या सूचनेनुसार योग्य ती पावले आपणही उचलू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आजार अंगावर काढू नका; जिवावर बेतेल
100 हून अधिक ताप असेल. प्रचंड सर्दी आणि खोकल्याने हैराण असाल तर तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहन आयएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी केले आहे. बाधा झाल्यानंतर वेळेवर उपचार घेतले नाहीत तर जिवावर बेतू शकते, तसेच लोकांमध्ये गेल्यास रुग्णांची संख्याही वाढू शकते असा इशारा त्यांनी दिला.
केंद्र सरकारने काय म्हटलेय?
श्वसनाच्या आजारांच्या बाबतीत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे. आरएसव्ही आणि ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हे सामान्य तापाचे विषाणू असून त्याचा चीनमध्ये उद्रेक झाला आहे. हे लक्षात घेऊन सरकार तेथील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच डब्ल्यूएचओला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगितले आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.