
शहर परिसरातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेने केडगाव, तपोवन रोड, नगर तालुक्यातील तांदळी वडगाव हादरले आहे. या प्रकरणी कोतवाली, तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केडगाव उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी (वय 17) 20 मार्चला दुपारी राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, अद्याप तिचा थांगपत्ता लागलेला नाही. तिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील काही कारणावरून आई आणि मुलीचा किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर फिर्यादी आणि आई दोघी बँकेत गेल्या होत्या. त्यानंतर मुलगी घरातून बेपत्ता झाली. घरात एका कोपऱ्यात ‘मी घर सोडून जात आहे’, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. मुलीचे अपहरण केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
दुसऱ्या घटनेत नगर तालुक्यातील तांदळी वडगाव शिवारात राहणारी अल्पवयीन मुलगी (वय 16) घरात असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे.
तिसरी घटना नगर शहरातील तपोवन रोडवर घडली आहे. एक 17 वर्षीय मुलगी कपड्याची बॅग घेऊन 20 मार्चला रात्री 9च्या सुमारास घराच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून निघून गेली आहे. तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यापूर्वी डिसेंबर 2024 मध्येही या मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, तेव्हा ती मिळून आली होती.