रविवारी दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा विमान अपघात झाला आहे. ज्यामध्ये 179 प्रवाशांचा मृत्यू झाला. जगभरात गेल्या 24 तासांत विमानांशी संबंधित तीन घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
दक्षिण कोरिया विमान अपघात
योनहाप वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आज सकाळी 9:07 वाजता जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भिंतीवर आदळले. यावेळी विमानात सहा क्रू सदस्यांसह एकूण 181 जण होते. या विमानात दोन प्रवासी थायलंडचे होते, तर उर्वरित सगळे दक्षिण कोरियाचे होते. विमान पक्षिच्या संपर्कात आल्यामुळे लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा, त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कॅनडामध्ये विमानाचे आपत्कालीन लँडिंग
याआधी शनिवारी रात्री एअर कॅनडाच्या विमानाचं हॅलिफॅक्स विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. PAL एअरलाइन्सचे विमान AC2259 शनिवारी रात्री झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावलं. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाचे आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर विमानात आग लागली. विमानाच्या लँडिंगला थोडाही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
नॉर्वेमध्ये धावपट्टीवर विमान घसरले
नॉर्वेमधील ओस्लो टॉर्प सॅनडफॉर्ड विमानतळावर शनिवारी रात्री उशिरा केएलएम रॉयल डच एअरलाइन्सचे विमान आपत्कालीन लँडिंग दरम्यान घसरले. ओस्लो विमानतळावरून ॲमस्टरडॅमला जाणाऱ्या बोइंग 737-800 विमानाच्या हायड्रोजन प्रणालीमध्ये बिघाड झाला. यानंतर हे विमान ओस्लोच्या दक्षिणेस 110 किमी अंतरावर असलेल्या सँडफिअर्ड विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षित लँडिंग होऊनही विमान धावपट्टीवरून घसरले आणि जवळच्या गवताळ भागात थांबले. या विमानात एकूण 182 प्रवासी होते.