
आयकर वेबसाइटवरील ताज्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2025 पूर्वी एकूण 3.24 लाख व्यक्तींनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचे आयकर विवरणपत्र दाखल केले. यापैकी एपूण 2.97 लाख व्यक्तींनी 1 ते 5 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे आयकर विवरणपत्र भरले.
आयकर पोर्टलवरील नव्या आकडेवारीनुसार, 5 ते 10 कोटी रुपयांच्या दरम्यान आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणाऱ्या करदात्यांची संख्या 16,797 आहे आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या 10,184 आहे. कंपन्या, फर्म्स, एचयूएफ, ट्रस्ट, व्यक्ती संघटना, सरकारी संस्था आणि स्थानिक प्राधिकरणे यांचा समावेश असलेला एकूण डेटा एकत्रित केल्यास असे आढळून आलंय की, एक कोटीपेक्षा जास्त रिटर्न भरणाऱ्या करदात्यांची एपूण संख्या 4.68 लाखांहून अधिक आहे. यामध्ये 1-5 कोटींच्या दरम्यान उत्पन्न असलेल्या 3.89 लाखांहून अधिक लोकांचा समावेश आहे. 36 हजारांहून अधिक लोकांचे उत्पन्न 5-10 कोटी रुपयांच्या दरम्यान होते. 43 हजारांहून अधिक लोकांचे उत्पन्न 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.
भरला 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्नाचा आयटीआर
आयकर वेबसाइटवर एकूण 14.01 कोटी नोंदणीकृत युजर्स आहेत. त्यापैकी वैयक्तिक युजर्स 12.91 कोटी आहेत.
नोंदणीकृत आणि आधार लिंक केलेल्या एकूण वैयक्तिक युजर्सची संख्या 11.86 कोटींहून अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 31 मार्चपर्यंत दाखल झालेल्या एकूण रिटर्नची संख्या 9.19 कोटी आहे आणि ई-व्हेरिफायड रिटर्नची संख्या 8.64 कोटी आहे.
आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढली
आर्थिक वर्ष 25 मध्ये आयटीआर-1, आयटीआर-2, आयटीआर-3, आयटीआर-4 आणि आयटीआर-5 च्या बाबतीत आर्थिक वर्ष 24 च्या तुलनेत आयकर रिटर्न भरण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.