मुंबई-नाशिक महामार्गांवरील शहापूर गोठेघर नजिक विचित्र अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले, तर 14 जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3.50 च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनरने समोर असलेल्या 3 वाहनांसह दुसऱ्या मार्गिकेवरील एका बसला जोराची धडक दिली. कंटेनरच्या धडकेमुळे बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून 3 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सदर अपघातात 14 जण जखमी झाले असून जखमींपैकी 8 जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, तर 6 जण शहापूर येथे उपचार घेत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, महामार्ग पोलीस केंद्रच्या छाया कांबळे, शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु केले. सर्व जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असून महामार्गांवरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचं काम सुरु आहे.