मंत्री भुसे यांच्या टायसन टोळीकडून अद्वय हिरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गावठी कट्टा रोखला; मालेगावात खळबळ

मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अद्वय हिरे हे रिंगणात आहेत. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते सोमवारी रिपाइं नेत्याच्या घरी गेले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे उमेदवार मंत्री दादा भुसे यांच्या तीन गुंडांनी हिरे यांच्यावर गावठी कट्टय़ातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला. गुन्हा दाखल करून या गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत शिवसेनेने या कृत्याचा निषेध केला आहे. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या घटनेने जिह्यात खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालेगाव बाह्यचे उमेदवार अद्वय हिरे हे सोमवारी सोयगाव येथे गेले. रिपाइंचे नेते दिलीप आहिरे यांच्या घरी जाऊन ते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत होते. मालेगावातील नामचीन गुंड टायसन हा त्याच्या तीन साथीदारांसह तेथे आला. त्याच्याजवळील गावठी कट्टा काढून त्याने हिरे यांच्यावर गोळय़ा झाडण्याची तयारी केली. तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून टायसन व त्याच्या साथीदारांना रोखले. पोलिसांना फोन करण्यात आला. ते आल्यानंतर हिरे हे त्या घरातून बाहेर पडले. कॅम्प पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी गुंड टायसन व त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिली. दगडफेक, शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, तीनही गुंडांना अटक करावी, अशी मागणी अद्वय हिरे यांनी केली आहे. या घटनेने मालेगावात खळबळ उडाली असून, सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

सरकार जबाबदार राहील

पालकमंत्री दादा भुसे यांच्या दहशतीला मी घाबरणार नाही. सरकार संरक्षण देऊ न शकल्याने मुंबईत एका माजी मंत्र्याची गोळय़ा झाडून हत्या झाली. सरकारकडून मला संरक्षण मिळाले नाही अन् माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले, तर त्याला सरकार जबाबदार राहील, असे अद्वय हिरे यांनी सांगितले. गुंडांना पैसे पुरविण्याचे, त्यांना जामीन देण्याचे काम पालकमंत्री दादा भुसे हेच करतात. त्यांचे हे कृत्य नैतिकतेला शोभणारे नाही, भुसे यांच्या भ्याडपणाचा जाहीर निषेध करतो, असा हल्ला अद्वय हिरे यांनी केला.