अजमेरहून परतणाऱ्या तीन भाविकांचा अपघाती मृत्यू, ट्रकला धडक दिल्याने भीषण दुर्घटना

अजमेर दग्र्याचे दर्शन घेऊन पालघरला परतणाऱ्या भाविकांच्या कारला गुजरात अंकलेश्वर येथे आज पहाटे भीषण अपघात झाला. यात तीन भाविकांचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ताहीर शेख, मुदस्सर पटेल, आयान चोगले अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर गुजरात येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात मृत्यू झालेले तिघे जण पालघर तालुक्यातील रहिवासी आहेत. बुधवारी पहाटे पालघरकडे परतत असताना त्यांच्या चारचाकी कारने एका ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला. त्यात मनोर येथील आयान चोगले, पालघर येथील ताहीर शेख व ताकवहळ येथील मुदस्सर पटेल यांचा मृत्यू झाला, तर काटाले येथील सलमान अल्ताफ पटेल शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासात असताना तीन तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला चिरडले; नागरिकांचा संताप

डोंबिवली – कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. पालिकेच्या कचऱ्याच्य असलेल्या आई आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाला चिरडले. या अपघातात निशा सोमेसकर (37) आणि अंश सोमेसकर (3) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी बेदरकार गाडी चालवणाऱ्या वाहनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

शिवाजी चौक ते दुर्गाडी पूल हा परिसर कल्याणमधील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. बुधवारी सकाळी निशा सोमेसकर आपल्या तीन वर्षांच्या मुलासह लालचौकी परिसरातून पायी जात होत्या. रस्ता ओलांडताना दूरवरून भरधाव येणाऱ्या महापालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकने त्या दोघांना धडक दिली. अपघातानंतर निशा सोमेसकर व त्यांच्या जखमी मुलाला पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी लालचौकी परिसरात मोठी गर्दी करून निषेध व्यक्त केला.

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तरुणाला रोडरोलरने चिरडले

भिवंडी – जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तरुणाला रोडरोलरने चिरडल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. याप्रकरणी रोलरचालकाच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाशकुमार महतो (25) असे चिरडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर बसंतकुमार वर्मा असे चालकाचे नाव आहे. गोदाम पट्ट्यात काम करणारा प्रकाशकुमार हा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जेवण करून मुंबई-नाशिक महामार्गासमोरील बाबोसा कंपाऊंडजवळील मामा कंपाऊंडच्या रस्त्यावर झोपला होता. त्यावेळी रोडरोलरने प्रकाशकुमार यास चिरडले आहे. दरम्यान कोनगाव पोलिसांनी प्रकाशकुमार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.