Maharashtra Assembly Election 2024 : तीन सख्खे भाऊ निवडणूक रिंगणात

तीन सख्खे भाऊ एकाच जिह्यातून तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा आगळावेगळा विक्रम नंदुरबार जिह्यात घडत आहे. गावित कुटुंबातील ही तीन सख्खी भावंडे आहेत. डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित अशी त्यांची नावे आहेत. डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे, राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि नवापूर मतदारसंघातून शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. पहिल्यांदा नाही तर दुसऱयांदा हे तीन भाऊ एकाच वेळी निवडणूक लढवत आहेत.

नंदुरबारच्या राजकारणात विजयकुमार गावित यांच्या परिवाराचे वर्चस्व आहे. स्वतः डॉ. विजयकुमार गावित हे सहा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. यंदा ते सातव्यांदा रिंगणात आहेत. 2024 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. डॉ. गावित यांनी आधी अपक्ष, नंतर तीन टर्म राष्ट्रवादी व दोन टर्म भाजपकडून उमेदवारी केली आहे. आतादेखील ते भाजपचे उमेदवार आहेत.

 विजयकुमार गावित यांचे लहान बंधू 2009 मध्ये शरद गावित यांनी नवापूर मतदारसंघातून विजय मिळविला होता. नंतर ते 2014 व 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार राहिले. परंतु त्यांना यश मिळू शकले नाही. यंदाही ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 राजेंद्रकुमार गावित हेदेखील दुसऱयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना यश मिळू शकले नव्हते. आताच्या निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळविली आहे.