तळेगाव एमआयडीसीत तीन बांगलादेशी जेरबंद, वर्षभरात 29 घुसखोरांवर कारवाई

पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातही बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झाला असून ते सर्रासपणे बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड काढून हिंदुस्थानात अवैधरीत्या राहणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (दि. 30) सकाळी नवलाख उंब्रे येथे करण्यात आली. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 29 बांगलादेशी आणि 4 रोहिंग्यांवर कारवाई केली आहे.

हुसेन शेख (वय 31), मोनिरुल गाझी (26), अमीरूल साना (वय 34, तिघे रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, मूळ- बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई रोशन पगारे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळेगाव एमआयडीसी ठाण्यातील दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत असताना रोशन पगारे यांना नवलाख उंब्रे येथील श्रीनिवास कंपनीत एका खोलीमध्ये बंगाली बोलणारे राहत असून ते बांगलादेशी असावेत, असा संशय असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तीन बांगलादेशी मिळून आले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे हिंदुस्थानी आधारकार्ड, पॅनकार्ड, पश्चिम बंगाल येथील जन्म प्रमाणपत्र व ग्रामपंचायत दाखला तसेच भारतीय ई-श्रम कार्ड मिळून आले. याशिवाय त्यांच्या मोबाईलमध्ये ते बांगलादेशी नागरिक असल्याचे ओळखपत्र, बांगलादेशी पासपोर्ट, बांगलादेशी जन्मदाखला अशी बांगलादेशी कागदपत्रेही मिळून आली. त्यांच्या मोवाईलमध्ये त्यांनी बांगलादेश येथील कोड नंबर असणाऱ्या वेगवेगळ्या फोनवर संपर्क साधल्याचेही निष्पन्न झाले.

पाच वर्षांपूर्वी आले हिंदुस्थानात

हे तीन बांगलादेशी नागरिक सुमारे पाच वर्षापूर्वी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा हिंदुस्थानात राहण्याकरिता लागणाऱ्या वैध व्हिसाशिवाय हिंदुस्थान वांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने हिंदुस्थानात आले. बनावट कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला आदी कागदपत्रे बनवून घेऊन त्याआधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवून त्यांनी सिमकार्ड प्राप्त केले. नवलाख उंब्रे येथील श्रीनिवास कंपनी येथे कंपनीमध्ये काम करीत असल्याचे निष्पन्न झाले.

62 पासपोर्ट रद्द करण्याची कार्यवाही

■ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत बेकायदेशीररीत्या हिंदुस्थानात घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या 29 बांगलादेशी आणि 4 रोहिंग्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी तयार केलेले 62 पासपोर्ट रद्द करण्याची कार्यवाही केली आहे. त्याचबरोबर या आरोपींनी बनविलेली आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड ही ओळखपत्र रद्द होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.