मानवतेला काळिमा फासणारी घटना; कठोरा बाजार येथे मतिमंद महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींच्या मुसक्या आवळल्या

शेतात काड्या, गोवऱ्या आणण्यासाठी गेलेल्या मतिमंद महिलेवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडली. कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. आठ दिवसांनंतर या पुतण्याने काकाला सांगितल्यानंतर ही घटना गुरुवार, 20 मार्च रोजी उघडकीस आली.

या प्रकारणी मतिमंद महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून सद्दामखाँ अजमेरखाँ पठाण, सादीकखाँ शरीफखाँ पठाण, फारुखखाँ जिलाणीखाँ पठाण (सर्व रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीत पीडित महिलेच्या पतीने म्हटले आहे की, एक वर्षापूर्वी आमचे लग्न झाले असून, माझी पत्नी मतिमंद आहे. आमची गावाशेजारी शेत जमीन असून, आमची उपजीविका पूर्ण शेतीवरच आहे. गुरुवार, 13 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आम्ही दोघांनी जेवण केले. त्यानंतर पत्नीही शेतात जळतन आणण्यासाठी गेली आणि मात्र सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परत आली. तिचा पती घरात आल्यानंतर ती रडत होती, पण ती मतिमंद असल्याने ती काही एक सांगत नव्हती. तिला वारंवार काय झाले असे विचारण्यात येत होते. मात्र तिला काही सांगता येत नसल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत असेही म्हटले आहे की, गुरुवार, 20 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास माझा पुतण्या घरी आला व त्याने सांगितले की, गुरुवार, 13 मार्च रोजी दुपारी 2 ते 3 वाजेदरम्यान मी शेतात काम करत असताना मला तुमच्या शेतात ओरडण्याचा आवाज आल्याने मी शेतात जाऊन पाहिले असता तुमच्या शेताजवळ असलेल्या नाल्याजवळ काकूला आपल्या गावातील सद्दामखाँ अजमेरखाँ पठाण, सादीकखाँ शरीफखाँ पठाण, फारुखखाँ जिलाणीखाँ पठाण हे बलeत्कार करताना मी लांबून पाहिले. तेव्हा माझ्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये व्हिडिओ चालू करून जवळ गेलो असता दोघे मला पाहून पळून गेले. यातील फारुखा त्यांचा छळ करत होता. आरडाओरडा केल्यानंतर काकूची सुटका झाली. यानंतर काकूला घरी घेऊन येत असताना सद्दामखाँ अजमेरखाँ पठाण याने अडवून माझा मोबाईल फोडला व त्याने धमकी दिली की, तू जर आम्ही काय केले आहे हे कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तेथून निघून गेला. परंतु त्यापूर्वी माझ्या मोबाईलमध्ये काढलेला व्हिडिओ माझ्या एका मित्राला पाठवला होता. त्यानंतर काकूंना गावाजवळ सोडून निघून गेलो असे त्याने सांगितले. याबाबत झालेल्या घटनेची माहिती गुरुवारी काकाला दिल्यानंतर काकांनी म्हणजे पीडित मतिमंद महिलेच्या पतीने भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून या तिघांना अटक करण्यात आली असून, तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.