
ई-सिगारेटच्या कारवाईची धमकी देऊन तरुणीकडे पैसे उकळणाऱया तिघांना एमआयडीसी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. दिलशाद खान, मोहमद रफिक चौधरी आणि सिमरजणीत सिंग अशी त्यांची नावे आहेत. दिलशादविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्या तिघांनी यापूर्वी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
तरुणी चार दिवसांपूर्वी पवई येथून रिक्षाने जात होती. तेव्हा मोटरसायकलवरून आलेल्या एकाने ती रिक्षा अडवली. तो रिक्षात जाऊन बसला. आपण पोलीस आहोत, ई-सिगारेट प्रकरणी कारवाई केली जाणार आहे. ते ऐकून तरुणीला धक्काच बसला. कारवाईच्या नावाखाली त्याने तरुणीकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. ठगाने तिला तिच्या मित्राकडून दहा हजार रुपये काढून देण्यासाठी तगादा लावला. तरुणीने याची माहिती तिच्या भावाला सांगितले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तिच्या भावाने तिला व्हिडीओ काढण्यास सांगितला. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पवई पोलिसांनी त्या तरुणीला शोधून तिचा जबाब नोंद केला. त्यानंतर गुन्हा नोंद करून तो पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांना वर्ग केला.