अवैध वाळू उपसा : सहा हायवा जप्त, 3 कोटी 56 लाखांचा मुद्देमाल जप्त

जालन्यातील अंबड तालुक्यातील आपेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी मध्यरात्री अचानक धाड टाकली. या कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरले जात असलेले तब्बल सहा हायवा ट्रक जप्त करण्यात आले. 3 कोटी 56 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या हायवावर दंडही ठोकण्यात आला आहे.

ही कारवाई 25 एप्रिलच्या मध्यरात्री करण्यात आली. तहसीलदार चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच काही ट्रकचालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे काही हायवा घटनास्थळीच पकडल्या. दरम्यान, या अवैध वाळू उपशाला स्थानिक प्रशासनातील काही व्यक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणात आपेगावचे सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावरही गोपनीय चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान या वाहनावर 22 लाख रुपये दंड आकारण्यात आला. तसेच 60 ते 70 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे अपर जिल्हाधिकारी पुलकीत सिंग यांच्या बदलीनंतर वाळू माफियाने पुन्हा अवैध रेती वाहतूक सुरु केली. मात्र तहसीलदार चव्हाण यांनी ही कारवाई केली. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी बाळू सानप, किरण जाधव, श्याम विभुते व इतर महसूल सहाय्यक व ग्राम महसूल अधिकारी आणी पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख, गणेश मुंढे, अविनाश पगारे, रामदास केंद्रे व गोंदी पोलिसांनी केली.

वाळूने भरलेले हायवा अडविण्यासाठी टायरचे वाल तोडले हायवा पळून जाऊ नये म्हणून हायवाच्या चारही टायरचे वाल तोडून टाकण्यात आले. जेणेकरून वाळूने भरलेली हायवा चालवता येऊ नये. पाठीमागील टायरचे चार-चार वाल तोडून टाकण्यात आले. तरी देखील अंधाराचा फायदा घेऊन काही वाहने पळून गेले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या मदतीने रात्री 3 वाजताच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक यांना फोन करून तात्काळ पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. तसेच महसूलच्या सर्व पथकाला गोदावरी पात्रात बोलावून घेण्यात आले. सकाळी 6 वाजता आपेगाव 6 हायवा जप्त करण्यात आले. जप्त केलेले एक महसूल कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी यांच्यासह तहसील कार्यालयात आणून लावण्यात आले. यावेळी सर्व वाहनांचे तपासणी करून पंचनामा करण्यात आला. ड्रायव्हरचा जबाब घेऊन त्यावर स्वाक्षरी व निशाणी अंगठा घेण्यात आले. लोकेशन देणाऱ्यांवरही कारवाई कारवाईमुळे सर्व अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या रेती चोर व माफिया यांचे धाबे दणाणले. यापुढेही अशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. रेती माफियांकडून महसूल पथक, नायब तहसीलदार अथवा तहसीलदार यांचे लोकेशन देत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध सुद्धा कडक कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकेशन देणाऱ्यांनी सुद्धा याबाबतची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला.

गोपनीय चौकशी करण्यात येणार…..
गोदावरी तसेच नदीकाठच्या काही गावांमधून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील हे वाळू वाहतुकीत सहभागी असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यांची गोपनीय चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत काही तथ्य आढळून आल्यास सदरील सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य तसेच पोलीस पाटील त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. गोदावरी व इतर नद्याच्या ठिकाणी वाळू उपसा होतो. अशा ठिकाणी सीआरपीसी 144 कलम लागू करण्यात आलेला आहे. आपेगाव येथून जप्त केलेली 60 ते 70 ब्रास रेती घरकुल व शासकीय कामांना देण्यात येणार आहे, असे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले