इंफाळमध्ये ‘अफ्स्पा’ विरोधात मोर्चा; शेकडो लोक रस्त्यावर उतरले; महिला, मुलांच्या हत्येविरोधात घोषणाबाजी

हिंसाचाराच्या आगीने जळत असलेल्या मणिपुरात शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून अन्यायाविरोधात आवाज उठवला. महिला आणि लहान मुलांच्या हत्येच्या निषेधार्थ राजधानी इंफाळ येथे रॅली काढण्यात आली. तसेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा, एफएसपीए) पुन्हा लागू केल्याच्या विरोधात आंदोलन करून घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन निषेध व्यक्त केला. ‘मणिपूर वाचवा’ अशा घोषणा देत उपस्थित महिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला. मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून विविध संघटनांनी एकत्र येत मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसले.

गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपुरात हिंसाचाराची आग आहे. अनेक जिह्यांतील इंटरनेट सेवा आजतागायत बंद आहे. मागील महिन्यात जिरी आणि बराक नदीत तीन महिलांसह तीन मुलींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. त्यानंतर राज्यातील हिंसेने पुन्हा एकदा तोंड वर काढले. मे 2024 मध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात 250 हून अधिक लोक मारले गेले, तर हजारो लोक बेघर झाले.

’अफ्स्पा’ हटवण्याची मागणी

मणिपूरमधील पाच जिह्यांतील सहा पोलीस ठाण्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार लागू (अफ्स्पा) करण्यात आला आहे. इंफाळमधीलही काही पोलीस ठाण्यांमध्ये ‘अफ्स्पा’ लागू आहे. या कायद्यामुळे लष्कर या परिसरातील कोणाचीही कधीही चौकशी करण्यासाठी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊ शकते. सर्वप्रथम पूर्वेकडील राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आला होता.