
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा अमेरिकेलाही फटका बसत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. 2020 नंतर बाजारातील एका दिवसातील ही सर्वा मोठी घसरण आहे. अमेरिकेला फटका बसत असूनही ट्रम्प त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. तसेच टॅरिफप्रमाणेच त्यांच्या अनेक धोरणांबाबत अमेरिकेच्या जनतेत नाराजी आहे. या नाराजीच्या शनिवारी उद्रेक झाला आणि ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकी जनता रस्त्यांवर उतरली. 50 राज्यातील 1200 शहरांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
ट्रम्प विक्षिप्त असून त्यांच्या मनमानी कराभाराचा निषेध असो, अमेरिकेत राजेशाही नाही, आम्ही हा वेडेपणा खपवून घेणार नाही, अमेरिकेचे नुकसान करणारे ट्रम्प आणि मस्क चालते व्हा असे फलक हातात घेत लाखो नागरिक रस्त्यांवर उतरले होते. अमेरिकेच्या अनेक शहरात रॅली निघाल्या, जिथे निदर्शकांनी ट्रम्प आणि त्यांच्या आक्रमक व्यापार धोरणांना विरोध केला.
डोनाल्ड ट्रम्प आणि ऐलॉन मस्क यांनी सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. आता टॅरिफ धोरणांमुळे ते देशातील शेअर बाजार आणि उद्योगधंदे बंद करतील, अशा भावना व्यक्त करत जनतेने संताप व्यक्त केला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फुटीर धोरणांना विरोध करण्यासाठी शनिवारी लाखो निदर्शकांनी अमेरिकेच्या प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर गर्दी केली होती.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यापासून ते व्यापारी शुल्क आणि नागरी स्वातंत्र्यांचे ऱ्हास करण्यापर्यंतच्या ट्रम्प यांच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. वॉशिंग्टन, न्यू यॉर्क, ह्युस्टन, फ्लोरिडा, कोलोरॅडो आणि लॉस एंजेलिससह इतर प्रमुख शहरात रॅली काढत नागरिक रस्त्यांवर उतरले होते. उद्योजकांचा एक गट आपल्या देशावर नियंत्रण ठेवत आहे. हे चांगले नाही, असे एका आंदोलनकर्त्याने सांगितले.
टॅरफ धोरण हा आर्थिक वेडेपणा असून तो आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलणार आहे. ट्रम्प यांनी देशासमोर मोठे संकट निर्माण केले आहे. आपल्या देशाला एक विक्षिप्त राष्ट्राध्यक्ष लाभला आहे. ट्रम्प आणि मस्क हे दोघेही देशाला संकटात ढकलत आहेत. देशातील कोणत्याही नागरिकाला अर्थव्यवस्थेसमोर संकट उभे करणारा हुकूमशहा नको आहे, असा संतापही निदर्शकांनी व्यक्त केला.