
अमित शहा यांच्या रायगड दौऱयासाठी हजारो पोलीस आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण सरकारी यंत्रणाच या दौऱयासाठी वेठीला धरली. या दौऱ्याचा जबरदस्त फटका शेकडो शिवभक्तांना बसला. एकीकडे टळटळीत ऊन असतानाच शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी रायगडावर आलेल्या शिवभक्तांना अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव राजसदरेवरच पाच तास अक्षरशः कोंडून ठेवले. ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना नेटके नियोजन. उन्हाचे चटके खात ताटकळत उभे असलेले अनेक शिवभक्त भोवळ येऊन कोसळले. यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
अमित शहा यांच्या स्वागतासाठी रायगडावर अनेक व्हीआयपी उपस्थित होते. त्याशिवाय राज्याचे अवघे मंत्रिमंडळच किल्ल्यावर आले होते. अमित शहा यांच्या रायगड दौऱयासाठी दोन हजारांहून अधिक पोलीस आणि अधिकाऱ्यांचा विशेष बंदोबस्त ठेवला होता.
सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याच्या बाटल्याही जप्त केल्या
दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त तिथीप्रमाणे पुण्यतिथीनिमित्त छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येतात. आजही सकाळपासूनच अनेक शिवभक्तांनी किल्ल्याकडे कूच केले. मात्र राजसदरेवर येणाऱ्या शिवभक्तांची कसून तपासणी करण्यात येत होती. प्रचंड ऊन असल्याने शिवप्रेमींनी सोबत पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या. या बाटल्यादेखील सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी काढून घेतल्या. सकाळी 8नंतर राजसदरेवर गेलेल्यांना बाहेर पडू दिले जात नव्हते. पिण्याच्या पाण्यावाचून अनेकांचे हाल झाले. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, पायाखाली तापलेली जमीन आणि प्यायला पाण्याचा घोट नाही… त्यामुळे कोंडून ठेवलेले शिवभक्त हवालदिल झाले. अनेकांना भोवळ आली, तर अनेकांनी अक्षरशः जमिनीवर बसकण मारली. संतापलेले शिवभक्त पोलिसांना जाब विचारत होते, मात्र त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले.
पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाच नाही
अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या वेळी जिह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होती. पण ही अपेक्षा सपशेल फोल ठरली. शहा यांनी आपल्या भाषणातदेखील आपण राजकीय विषयावर बोलणार नाही असे सांगून हात झटकले. पालकमंत्री पदावरून मिंध्यांनी भाजपला फुसका दमदेखील दिला होता. भरत गोगावले यांना डावलले तर उठाव होईल, अशी संघर्षाची भाषा आमदार महेंद्र दळवी यांनी केली होती. पण त्यावर काहीच निर्णय न झाल्याने मिंध्यांच्या पदरी निराशा आली.
तटकरेंच्या घरी जेवणावळ; आमरस, मोदक, मिसळपाव, साबुदाणा वड्यावर ताव
गृह मंत्री अमित शहा हे पुण्याहून थेट पाचड येथे आले. तिथे जिजाऊ मासाहेबांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी रायगडावर शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. या सोहळ्यानंतर शहा यांचा ताफा रायगडचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी जाऊन पोहोचला. तेथे अमित शहांसाठी खास मराठमोळ्या जेवणाचा बेत ठेवला होता. त्यात आमरस, मोदक, मिसळपाव, साबुदाणा वडा अशा पदार्थांवर मंत्री व नेत्यांनी यथेच्छ ताव मारला. मात्र ही डिनर डिप्लोमसी फळून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळणार का याची खमंग चर्चा दिवसभर सुरू होती.
- गतवर्षी 12 एप्रिल रोजी खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी झालेल्या प्रचंड गर्दी आणि उकाडय़ामुळे 11 जणांना जीव गमवावा लागला होता. शनिवारी अशीच चेंगराचेंगरी होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र गर्दी पांगवण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नव्हती.
शिवभक्तांनी किल्ल्याकडे कूच केले. मात्र राजसदरेवर येणाऱया शिवभक्तांची कसून तपासणी करण्यात येत होती. प्रचंड ऊन असल्याने शिवप्रेमींनी सोबत पाण्याच्या बाटल्या आणल्या होत्या. या बाटल्यादेखील सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी काढून घेतल्या. त्यामुळे शिवप्रेमींचे मोठे हाल झाले.
- गृह मंत्री अमित शहा आपल्या सरकारी लवाजम्यासह सकाळी साडेअकराच्या दरम्यान रायगडावर रोपवेने पोहचले. दुपारी दीडच्या सुमारास राजसदर येथील अभिवादन कार्यक्रमाची सांगता झाली. मात्र तोपर्यंत सुमारे पाच तास हजारो शिवभक्त अडकून पडले.
- अमित शहांच्या दौऱयामुळे शिवभक्तांना व्हीआयपी कल्चर आणि पोलीस बंदोबस्ताचा भयंकर मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे सूर्य आग ओकत असतानाच अनेकांना पिण्याचे पाणीदेखील मिळाले नाही. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा फटका बसला.
- रायगडावर सकाळी 7 वाजल्यापासून रोपवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र आज ही व्यवस्था सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली. दिवसभर हा रोपवे फक्त मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीच सुरू होता. त्यामुळे शिवप्रेमींना शेकडो पायऱ्या चढून रायगडावर जावे लागले.