पनवेलमध्ये भाजपला खिंडार; हजारो उत्तर भारतीयांचा शिवसेनेत जम्बो प्रवेश, उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत

पनवेलमध्ये आज भाजपला खिंडार पडले. पनवेल विधानसभेतील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी, कार्यकर्ते, उत्तर भारतीय नागरिक महासंघ, राष्ट्रीय एकता संघासह उत्तर भारतीयांच्या विविध संघटनांतील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जम्बो प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचे शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती देत स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विजयाची मशाल पेटवून पनवेल विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणारच, असा निर्धार हजारो उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

उत्तर भारतीयांचा राष्ट्रीय एकता संघ हा मुंबई व नवी मुंबईतील दोन लाख कार्यकर्त्यांचे संघटन म्हणून ओळखला जातो. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकता संघाचे ऍड. पंकज श्रीवास्तव यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  उत्तर भारतीय नागरिक महासंघाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यात माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचे सख्खे मेहुणे नागेंद्र प्रतापसिंह यांचा समावेश आहे. नागेंद्र प्रतापसिंह हे उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष भूपेंद्रकुमार सिंह, हिंदुस्थानी सैन्यदलातील निवृत्त जवान व राष्ट्रीय एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबू आर. के. सिंह, यूपी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष वाय. के. सिंह, उत्तर भारतीय कामगार महासंघाचे अध्यक्ष जे. के. सिंह, भाजप उत्तर भारतीय सेलचे विनय दुबे, विकासक राजहंस पांडे, बिल्डर असोसिएशनचे सचिव दिलीप मिश्रा, भाजप उत्तर भारतीय सेलचे महेश पांडे, अमीनभाई विराणी, सुरेंद्रकुमार सिंह, मुसादीक मोडक, इलियाज काझी, दीपक ठिंबरे, सुयोग डोंगरे, अनिल विश्वकर्मा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, मनोहर भोईर, सुरेंद्र म्हात्रे, अनिल नवगणे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील यांच्यासह नवी मुंबईतील शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.