खंडोबा गडावर ‘येळकोट येळकोट’चा जयघोष

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच खंडोबा गडावर दर्शनासाठी रांगा लागल्या. ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.

दिवाळीच्या शालेय सुट्टया व रविवार असल्याने मुला- बाळांना घेऊन आलेल्या भाविकांची संख्या जास्त होती. शनिवारी पुजाऱ्यांची घरे, लॉज, धर्मशाळा येथे भाविक उतरले होते. खंडोबागड, कडेपठार मंदिर, कहा नदीचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. खंडोबा गडामध्ये अभिषेक पूजा, तळी-भंडारा आदी विधी भाविकांनी केले. लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने खंडोबाला लग्नपत्रिका अर्पण करण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. होळकरांच्या चिंचबागेमध्ये उतरलेल्या भाविकांनी जागरण गोंधळ करून बानू देवीला मांसाहारी नैवेद्य अर्पण केला. भाविकांना झटपट दर्शन घेता यावे, यासाठी श्री मार्तंड देवसंस्थानाने विशेष व्यवस्था केली होती.