शेकडो लाडक्या बहिणी अनुदानापासून वंचित; 30 सप्टेंबरअखेर अर्ज सादर करणाऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 30 सप्टेंबरअखेर अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिला अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. तसेच काही महिलांचे बँकेतील खाते आधार लिंक नाही, बँक खाते बंद झाले आहे, यासह वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी महिलाही शासकीय साहाय्यापासून वंचित राहिले आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाकडून 21 ते 64 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जात आहे. राज्य शासनाने ही योजना राज्यात लागू केली. त्यामध्ये वेळोवेळी नियम व अटी शिथिल करण्यात आल्या. त्यामुळे या योजनेला महिलांचा प्रतिसाद मिळाला. 30 सप्टेंबरअखेर शेवटच्या टप्प्यात अर्ज सादर करणाऱ्या शेकडो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे उशिरा अर्ज सादर केल्याने पैसे जमा झाले नाहीत का? किंवा बँकेतील तांत्रिक कारणांचा महिलांना फटका बसला आहे. लाभार्थी होऊनही लाभ मिळाला नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे गरजेचे होते. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरण्यासाठी टपाल विभागासह विविध सरकारी बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, त्यातील अनेक महिलांची लग्नाच्या अगोदर असलेल्या नावांनी खाती होती. त्यामध्ये आधार क्रमांक लिंक नसल्याने अशा महिलांना टपाल खात्याव्यतिरिक्त दिलेले बँक खाते निरर्थक ठरले आहे. अशा महिला योजनेत लाभार्थी होऊनही त्यांना लाभ मिळाला नाही. त्यांनी आधार लिंक तपासणी केली असता त्यांचे आधार कार्ड वेगळ्याच बँकेला लिंक असल्याचे समोर आले.

लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला अर्ज यशस्वीपणे जमा केला. तसा संदेश मला आला. मात्र, आजपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही. या योजनेचा अर्ज भरताना मी लग्नानंतरच्या नावाचा बँक खाते क्रमांक दिला होता. त्याचा काहीही उपयोग झाला नाही.