पॅरिसच्या चोरांच्या प्रेमात

>> मंगेश वरवडेकर

पॅरिसला चालला आहेस ना, पाकीट सांभाळ, बॅगा सांभाळ… कधी काढून घेऊन जातील कळणारसुद्धा नाही. पॅरिसला एकटा अजिबात फिरू नकोस. रात्रीचे पॅरिस बघायचेय तर स्वतःला आवर. नाहीतर तुला नागडं करतील. आयफेल टॉवर म्हणजे जणू चोरांचा अड्डाच. इथे तर तुमची अंतर्वस्त्रंही गायब करतील, इतके सफाईदार पाकीटमार-चोर आहेत. ट्रेन आणि मॉलमध्ये असशील तर बाहेर काहीच ठेवू नकोस. सतत अलर्ट रहा. अशा एक नव्हे, असंख्य सूचना देऊन घाबरवण्याचे-खबरदार करण्याचे कार्य मुंबईत हितचिंतकांनी केले होते. त्यामुळे पॅरिसला जातोय की इराकला, हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला होता.

मुंबईहून पॅरिस गाठल्यावर मनात काहीशी भीती होती. फॅशननगरी असली तरी मनात किंचितसे वेगळे चित्र उभे राहिले होते. त्यात भर म्हणजे, इथे भेटलेल्या प्रत्येक हिंदुस्थानीनेही पॅरिसचे हेच हुबेहूब चित्र रंगवले. हे करू नकोस, ते करू नकोस. इथे फिरू नकोस. अजून बरंच काही… कळतंच नव्हते की, हे सर्व खरं सांगायताहेत की घाबरवताहेत. सारेच पॅरिसच्या चोरांच्या प्रेमात होते. दहशतीत होते हे जाणवलं.

अपवाद फक्त पॅरिसमध्ये ओळखीचा झालेल्या रमेश भावसारचा. तो म्हणाला, पॅरिस अत्यंत सुरक्षित शहर आहे. फक्त तुम्ही आपली काळजी घ्या. चोर कुठे नसतात. आपल्या मुंबई-दिल्लीत तर याच्या पन्नासपट पाकीटमार आहेत, चोर आहेत. म्हणून आपण आपल्या शहरांना असुरक्षित मानतो का? फक्त तुम्ही बेजबाबदारपणे वागून चोरांना आमंत्रण देऊ नका. तुमचा वेंधळेपणाच तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. रमेशचे हे शब्द मला प्रेरणा देणारे ठरले. तो मुंबईचाच असल्यामुळे त्याने थेट मला लालबागला नेले. तो म्हणाला, तू गणेशोत्सवाच्या वेळी लालबागला जातोस? मी हसलो. कारण मी तेथेच असतो. पुढे रमेश म्हणाला, आगमन सोहळय़ाला-विसर्जनाला आणि गणेशोत्सवादरम्यान चोर किती मोठय़ा प्रमाणात कामाला लागले असतात. शेकडो-हजारोंच्या संख्येने पाकीट-मोबाईल चोरीला जातात ना. ते चोर आपलेच असतात आणि ते आपल्याच गोष्टी चोरतात. तू याला काय म्हणशील? आपले लालबाग धोकादायक आहे का? उलट आपण म्हणतो, इतक्या गर्दीत चोरी होणारच. त्यात काय एवढं! मग पॅरिसमध्ये पाकीट मारणं किंवा एखादी गोष्ट चोरीला जाणं ही फार मोठी गोष्ट कशी होऊ शकते. आपल्या देशात काहीही झालं तरी चालतं आणि युरोपियन देशात असं काही घडलं तर डोंगर कोसळल्याची भावना चुकीची आहे. जर तू पॅरिसला धोकादायक मानत असशील तर हे युरोपियन आपल्या देशाला काय म्हणत असतील याची कधी कल्पना केली आहेस? रमेशच्या या प्रश्नाने माझ्या अंगावर शहारे उभे राहिले.

मग मी काही आकडे जाणून घेतले. जगात सर्वात जास्त पर्यटक पुठे येतात? उत्तर होतं, पॅरिस या शहरात. फ्रान्सही नाही हा. पॅरिसमध्ये वर्षाला 5 कोटींपेक्षा अधिक परदेशी पर्यटक येतात आणि आपल्या संपूर्ण हिंदुस्थानात वर्षाकाठी दीड कोटीच्या आसपास. मग आता तुम्हीच सांगा, पॅरिस हे चोरांचे शहर आहे म्हणून इतके प्रचंड पर्यटक येतात का ? की हिंदुस्थानाबद्दल परदेशी पर्यटकांच्या मनात वेगळी भीती असल्यामुळे इतके कमी येतात? याचा आपणच विचार करायला हवा. आपल्या इथे पर्यटनाला प्रचंड वाव आहे. आपण खेळाप्रमाणे पर्यटनातही हळूहळू प्रगती करतोय. काही वर्षांत ही स्थिती नक्कीच बदललेली असेल.

असो, ऑलिम्पिकच्या निमित्ताने पॅरिसमध्ये 50 लाखांच्या आसपास परदेशी पर्यटक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा आकडा खूप मोठा आहे. आतापर्यंत अधिपृतपणे किती पर्यटक आलेत याचा सरकारी आकडा बाहेर आला नसला तरी 30 लाखांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमी पॅरिसमध्ये पोहोचलेत. चोरांची भीती असती तर इतके पर्यटक नक्कीच आले नसते. काल मला एक हिंदुस्थानीच पॅरिसच्या चोरांची माहिती देत काळजी घेण्याचा सल्ला देत होता. मी त्याला तेथेच रोखले आणि पॅरिसची बदनामी करू नको म्हणून झाडले. आपण परदेशात पुठेही गेलो तर स्वतःची काळजी घेतोच ना. त्यामुळे चोर सर्वत्र असतात. प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायलाच हवी. पण ऑलिम्पिकच्या निमित्ताने फ्रेंच सरकारने उभारलेली सुरक्षा यंत्रणा अभूतपूर्व आहे. पॅरिसमध्ये चोर असले तरी सध्या ते अंडरग्राउंड झाले असावेत. माझ्याप्रमाणे लाखो पर्यटक पॅरिसमध्ये बिनधास्त फिरताहेत. सावध राहावे, पण चोरांची काळजी नसावी.