
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या बद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोन महिला पत्रकांरांना अटक करण्यात आली आहे. यावरून शनिवारी तेलंगणाच्या विधानसभेत गोंधळ झाला. त्यावेळी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ”जर कुणी नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करेल त्याला नागडं करून त्याची धिंड काढू”, असा इशारा दिला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनपर भाषण करताना रेवंथ रेड्डी म्हणाले की, ” ऑनलाईन समाजमाध्यमांवर ज्या प्रकारे बदनामीकारक पोस्ट टाकल्या जातात ते थांबविण्यासाठी एक कायदा बनायला हवा. तसेच खरे पत्रकार कोण हे देखील जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वृत्तपत्र, वाहिन्या आणि संकेतस्थळांसाठी काम करणारे पत्रकार तसेच अधिकृत पीआर एजन्सीसाठी काम करणाऱ्या पत्रकारांची यादी सरकारकडे असायला हवी. फक्त आणि फक्त त्या पत्रकारांच्याच पोस्ट वगळल्या जातील. त्या व्यतिरिक्त इतर कुणीही पत्रकार असल्याचे दाखवून चुकीच्या बदनामीकारक पोस्ट केल्या तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल”, असे रेवंथ रेड्डी म्हणाले.
”भारत राष्ट्र समिती पक्षाने त्या दोन महिला पत्रकार ज्यांनी माझ्या कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली त्यांच्या अटकेचा निषेध केला. मी आतपर्यंत संयम बाळगून होतो. पण किती वेळ शांत राहायचे. माझ्या घरातील महिलांबाबत चुकीची भाषा वापरल्यावर मी कसा शांत राहू? BRS वाले त्यांच्या आई बहिण बायकोबद्दल असं ऐकून शांत राहतील का? मी त्या सर्वांना पकडेन व त्यांना नागडं करून त्यांची धिंड काढेन. त्यांना माझ्या कुटुंबातील महिलांबाबत असे शब्द वापरायचा हक्क नाही’, असे रेवंथ रेड्डी म्हणाले.