सुनीलकुमार लवटे यांना जीवनगौरव, वर्ध्याच्या दाते संस्थेचे पुरस्कार जाहीर

वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांसाठी सोलापूरचे सरफराज अहमद, कुरखेडा-गडचिरोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख, पुणे येथील युवा संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे यांची निवड करण्यात आली. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संशोधक, अनुवादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांना जाहीर झाला.

पुरस्काराचे वितरण पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होईल. याबाबतची माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.

डॉ. भा. ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी 20 हजार व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी 10 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह  व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. यशवंत सुमंत कुटुंबीयांच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतोय.