हा निकाल अनाकलनीय, या मागचं गुपित शोधावं लागेल – उद्धव ठाकरे

हा निकाल अनाकलनीय, या मागचं गुपित शोधावं लागेल, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”लाटेपेक्षा त्सुनामी आली, असं वातावरण निकालावरून दिसत आहे. मात्र हा निकाल जनतेला पटलेला आहे की नाही, हा प्रश्न आहे. या सरकारला अधिवेशनात एखादं बिल मंजूर करण्यासाठी मांडण्याची गरजच नाही, असं आकड्यांवरून दिसत आहे. यांना विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही.”

”एक, दीड वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की, एकच पक्ष राहील. यांना वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी हवी आहे. याच दिशेने आपली आगेकूच होत आहे का, असं भीतीदायक चित्र आहे”, असंही ते म्हणाले.

”लोकांनी महायुतीला मते का दिली, असा प्रश्न आहे. सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून लोकांनी मते दिली का, कापसाची खरेदी होत नाही, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला जात आहेत, म्हणून लोकांनी महायुतीला मते दिली का? रागापोटी ही लाट उसळली आहे का, हे कळत नाही आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘हा निकाल अनाकलनीय’

”हा निकाल अनाकलनीय आहे. यामागचं गुपित काही दिवसांतच शोधावं लागेल. तूर्तास मी महाराष्ट्राला जनतेला सांगत आहे की, आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका. काही जण म्हणतात हा ईव्हीएमचा विजय आहे, असू ही शकतो. मात्र महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल, तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाही. मात्र मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू. महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू. आम्ही तुमच्यासोबत आहोत”, असं वचन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं.