लाइफनेस सायन्स इन्स्टिटय़ूटतर्फे ‘मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह’ या स्थित्यंतरावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नुकतीच जगातील अशा प्रकारची ही पहिलीच परिषद पार पडली. प्रख्यात मधुमेहतज्ञ पद्मश्री डॉ. व्ही. मोहन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.
मधुमेहपूर्व स्थिती ही गंभीर आरोग्यविषयक अवस्था आहे. या टप्प्यात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते, पण टाइप 2 मधुमेहाचे निदान करण्याएवढी जास्त वाढलेली नसते. आयसीएमआर-आयएनडीएबीच्या अभ्यासानुसार, देशातील 15.4 टक्के शहरी लोकसंख्या आणि 15.2 टक्के ग्रामीण लोकसंख्या मधुमेह पूर्व स्थितीत आहे. या मोठय़ा लोकसंख्येला मधुमेहापासून कसे वाचवायचे यावर या परिषदेत सविस्तर चर्चा झाली. यावेळी बीएमसीच्या उप आरोग्य कार्यकारी डॉ. दक्षा शहा, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. धीरज कपूर, ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ संशोधक डॉ. टेत्याना रॉक्स, फ्युचर व्हर्सिटी एज्युकेशन ग्रुप आणि लाइफनेस सायन्स इन्स्टिटय़ूटचे संचालक गोपाल शर्मा, डॉ. सुवर्णा पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.