
आरोपीने केलेले हे कृत्य लाज आणणारे आहे. त्याचा निषेध करायला हवा. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे सांगत हायकोर्टाने आरोपीला दोन लाखांचा दंड ठोठावला. हे पैसे रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. यातील 50 हजार रुपये एका अनाथालयाला दान करण्यास सांगितले.
कोर्टातील व्हर्च्युअल सुनावणीला उपस्थित राहणारा एक आरोपी थेट शौचालयातून हजर राहिला. तसेच तो बेडरूममधून उपस्थित राहिला. अशा ठिकाणांहून उपस्थित राहिल्याने गुजरात उच्च न्यायालयाने या आरोपीला मोठा दंड ठोठावत त्याची चांगलीच कानउघडणी केली. हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही, अशा शब्दांत कोर्टाने आरोपीला खडसावले. कोर्टरूमच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे सांगून कोर्टाने या आरोपीची चांगलीच कानउघाडणी केली.
गुजरात उच्च न्यायालयाने शौचालयातून सुनावणीला उपस्थित राहणाऱ्या आरोपीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला तसेच समाजसेवा करण्याची शिक्षा सुनावली, तर बेडरूममध्ये पलंगावर पडून सुनावणीला उपस्थित राहिल्याने त्याला कोर्टाने दंड ठोठावला. यातील आरोपीचे नाव धवल पटेल आहे. जो सुनावणीवेळी न्यायाधीश एमके ठक्कर यांच्या कोर्टासमोर ऑनलाइन व्हिडीओ लिंकद्वारे उपस्थित राहिला, परंतु तो आक्षेपार्ह अवस्थेत असल्याने त्याला सहभागी करून घेतले नाही. त्याला पुन्हा सहभागी करून घेतले तेव्हा तो शौचालयात होता. यावर कोर्टाने पुन्हा त्याची व्हिडीओ लिंक डिसकनेक्ट केली. त्याने केलेले हे कृत्य लाज आणणारे आहे. त्याचा निषेध करायला हवा असे सांगत कोर्टाने म्हटले की, अशा व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी. हायकोर्टाने त्याला दोन लाखांचा दंड ठोठावला. हे पैसे रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. यातील 50 हजार रुपये एका अनाथालयाला दान करण्यास सांगितले.
कोर्टाने पटेलला दोन आठवडय़ांपर्यंत हायकोर्ट परिसरातील गार्डनची स्वच्छता आणि झाडांना पाणी देण्याची शिक्षा दिली. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, न्याय आणि व्यापक जनहित लक्षात ठेवून ऑनलाइन सुविधा देण्यात आली होती, परंतु ऑनलाइन लिंकने जोडलेल्या व्यक्तीने कोर्टाची मानमर्यादा ठेवायला हवा. याचिकाकर्ता बेडरूममध्ये झोपलेला होता. कोर्टातील सुनावणी अशी पाहत होता. जणू काही तो सिनेमागृहात चित्रपट पाहत आहे. कोर्टाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असे कोर्टाने म्हटले.