‘रिलेशनशिप’ तोडण्यासाठी टॉनिकमध्ये विष मिसळले, प्रियकराची हत्या करणाऱ्या  प्रेयसीला फाशी

घरच्यांनी लग्न ठरवल्याने प्रियकराला सोडचिठ्ठी देण्याचा विचार केला. मात्र त्याने ‘रिलेशनशिप’ तोडण्यास नकार दिला. त्या रागातून प्रियकराला टॉनिकमध्ये विष मिसळून जीवे मारणाऱ्या तरुणीला तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हे ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकरण असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने 24 वर्षीय तरुणीला दोषी ठरवले.

ऑक्टोबर 2022मध्ये ही घटना घडली होती. लग्न करण्याआधी प्रियकराचा अडथळा दूर करण्यासाठी दोषी तरुणी ग्रीष्माने त्याच्या हत्येचा कट रचला होता. तिच्या कटात काका व आईने मदत केल्याचा आरोप होता. न्यायालयाने आरोपी काका निर्मलकुमारन नायरला दोषी ठरवून तीन वर्षे तुरुंगवास सुनावला, तर तरुणीच्या आईला पुराव्याअभावी निर्दोष ठरवले. याच वेळी मुख्य आरोपी ग्रीष्माला फाशी सुनावली. गुह्याचे गांभीर्य पाहता आरोपीचे वय व इतर परिस्थिती विचारात घेण्याची गरज नाही. ग्रीष्माने पद्धतशीर कट करून प्रियकर शेरॉनची हत्या केली. तसेच अटक टाळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला, असे निरीक्षण न्यायालयाने नेंदवले.