31 डिसेंबरचा जल्लोष साजरा करताना दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींना हिसका दाखवत पोलिसांनी त्यांची नशा उतरवली आहे. पालघर, ठाणे आणि रायगडात पोलिसांनी नाकाबंदी करून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाई केली. यामध्ये तब्बल 897 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली. थर्टी फर्स्ट लेट नाईट साजरी करणाऱ्यांवर पोलिसांनी टाईट कारवाई करून दारुड्यांच्या मुसक्या आवळल्या.
नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांच्या आनंदावर विरजण पडू नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पोलिसांनी कंबर कसली होती. यामध्ये पालघर 300, ठाणे 369 तर रायगडमध्ये 228 मद्यपींवर थेट कारवाई करण्यात आली. तसेच सर्व वाहनधारकांना न्यायालयात जाऊन वाहन सोडवून घेण्याचे समन्स वाहतूक विभागाने बजावले आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 450 वाहतूक पोलीस अपघात आणि ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह रोखण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सज्ज होते. त्यात वाहतूक पोलिसांनी ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात जोरदार कारवाई मोहीम हाती घेत नववर्ष स्वागताला रात्री मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यावर कारवाई केली.
भाईंदर, नवी मुंबई, कल्याणमध्ये 640 मद्यपी जाळ्यात
ठाणे परिमंडळ 1 अंतर्गत ठाणे नगर, नौपाडा, कळवा, मुंब्रा, कोपरी, वागळे, कापूरबावडी आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून 141 जणांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. तर नवी मुंबईत 266 वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मीरा-भाईंदरमध्ये 54 नशेखोरांची नशा उतरवली. तर कल्याण, डोंबिवलीमध्ये 320 तळीरामांवर पोलिसांनी चाप बसवला.
ठाण्यात दारू ढोसणाऱ्यांची संख्या वाढली
ठाणे शहरात दारू ढोसणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 2022 या संपूर्ण वर्षात 2 हजार 462 मद्यपींवर कारवाई करण्यात आली. 2023 मध्ये 2 हजार 333 तर 2024 च्या संपूर्ण वर्षात तब्बल 3 हजार 849 दारू पिऊन वाहन चालवण्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली आहे.