मुंबई टी-20 लीगला नवसंजीवनी देण्यासाठी रोहित सरसावला, सहा वर्षांनंतर नव्या दमात लीगचे पुनरागमन; लीगमध्ये मुंबईच्या दिग्गजांचीही बॅट तळपणार

कोरोनाच्या संकटामुळे बंद पडलेल्या मुंबई टी-20 लीगला नवसंजीवनी देण्यासाठी हिंदुस्थानचा कर्णधार आणि ‘मुंबईचा राजा’ असा लौकिक असलेला रोहित शर्मा सरसावला आहे. येत्या मेअखेरीस होणाऱ्या लीगला रोहित शर्माचा चेहरा बनविण्यात आल्यामुळे यात मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रिकेटपटूही 26 मे ते 5 जूनदरम्यान रंगणाऱ्या या लीगमध्ये आपली फटकेबाजी दाखवण्यासाठी उतरणार असल्याचे संकेत मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिले आहेत.

मुंबईच्या टी-20 लीगचे पहिले दोन हंगाम 2018 आणि 2019 मध्ये पार पडले होते, मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा पुन्हा होऊ शकली नाही. त्यामुळे या लीगला नवसंजीवनी देण्यासाठी एमसीएने गेल्या काही महिन्यांपासूनच पावले उचलली होती. आज एमसीएने आपल्या मुंबई टी-20 लीगच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा करताना लीगला ग्लॅमर मिळावे म्हणून रोहित शर्माच्या नव्या भूमिकेची घोषणा केली. या लीगचा रोहितच चेहरा असेल. त्यामुळे स्थानिक फ्रेंचायझींची ही टी-20 लीग मुंबई क्रिकेटच्या प्रतिभेचे थरारक आणि सर्वोत्तम दर्शन घडवेल, असा विश्वासही अध्यक्ष नाईक यांनी व्यक्त केला.

मुंबई लीगमधून मिळतील नव्या जगज्जेत्या संघातील खेळाडू

ही लीग भावी पिढीसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. या लीगमध्ये मुंबईतील शेकडो खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळेलच, पण याच लीगमधून हिंदुस्थानी संघाला पुन्हा एकदा जगज्जेते बनवणारे हीरे गवसतील, असा विश्वास एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी बोलून दाखवला.

लीगमध्ये दोन नवे मालक

यंदाच्या लीगमध्येही आठच संघ असतील. मात्र दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. सोबो मुंबई फाल्कन्स या संघाची फ्रेंचायझी रोडवे सोल्यूशन्स इंडिया इफ्रा लिमिटेडला देण्यात आली आहेत तर मुंबई साऊथ सेंट्रल या संघाचे अधिकार रॉयल एज स्पोर्ट्स ऍण्ड एंटरटेनमेंटला विकण्यात आले आहेत. या लीगमध्ये नॉर्थ मुंबई पँथर्स (होरायझन स्पोर्ट्स इंडिया), एआरसीएस अंधेरी (आर्क्स स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट), ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट (ट्रान्सकॉन ट्रायम्फ नाईट्स), नमो बांद्रा ब्लास्टर्स (पीके स्पोर्ट्स व्हेंचर्स), ईगल ठाणे स्ट्रायकरस (ईगल इन्प्रा इंडिया) आणि आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स (वर्ल्ड स्टार प्रीमियर लीग) हे आठ संघ होते. आता यातील दोन संघाला वगळून दोन नवे संघ तयार करण्यात आले आहेत.

मुंबईचे तारे लीगमध्ये तळपणार

ही लीग हिंदुस्थानच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी असल्यामुळे कसोटी संघात स्थान असलेल्या मुंबईच्या दोन-तीन खेळाडूंना वगळता सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या लीगमध्ये झळकतील आणि तळपतील. याच स्पर्धेतून मुंबईचा टी-20 संघ निवडला जाणार असल्यामुळे अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे हे हिंदुस्थानी संघात असलेले खेळाडू आणि हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेले भावी खेळाडू या लीगमध्ये एकत्रितपणे आपला धमाका करतील. मुंबई संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या पृथ्वी शॉलाही रणजी संघात पुनरागमन करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे तोसुद्धा खेळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.