आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यात चोरांची हातसफाई; 12 लाखांचा मुद्देमाल लांबवला, पोलिसांत 13 तक्रारी

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानात पार पडला. हजारो नागरिकांना या सोहळय़ासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी हजेरी लावली; पण काहींना हा शपथविधी चांगलाच महागात पडला. कारण चोरांनी हातसफाई करत लोकांचा किमती ऐवज सुमडीत लांबवला. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात 13 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

आझाद मैदानावर गुरुवारी पार पडलेल्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळय़ाकरिता पोलिसांचा तगडा

बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परंतु मोठय़ा संख्येने लोक या ठिकाणी जमल्याने चोरांना आयती संधी मिळाली. त्यांनी या गर्दीचा गैरफायदा उचलत 13 जणांच्या खिशातील किमती ऐवज लांबवला. या 13 जणांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे समजते. चोरांनी पर्स तसेच खिशातून मोबाईल, रोकड तसेच सोनसाखळय़ा सुमडीत काढून नेल्या. जवळपास 12 लाख रुपये किमतीच्या ऐवजांची चोरी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात चोरीची नोंद झाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या गर्दीत अनेकांचे मोबाईलदेखील लंपास झाले. मात्र याप्रकरणी पोलिसांनी मोबाईल गहाळ झाल्याची नोंद करून मोबाईलधारकांची बोळवण केल्याचे सूत्रांकडून समजते.