
गुजरातमधील भरुचमध्ये लष्करी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी चोरी केल्याप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने 2023 मध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. चार दिवसांपूर्वीच या तरुणाने आपल्या एका साथीदारासोबत लष्करी अधिकाऱ्याच्या घरात घुसून 2 लाख 74 हजारांपेक्षा जास्त किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारला, परंतु त्याला पोलिसांनी पकडले आहे. राम स्वरूप कुशवाहा आणि मिन्हज सिंधा अशा या दोन आरोपींची नावे आहेत. राम स्वरूप कुशवाहा आणि मिन्हज सिंधा या दोघांनी लष्करी अधिकारी सिराज मेहता यांच्या घरात घुसून लाखोंचा ऐवज लंपास केला. मात्र या दोघांनाही गुजरात पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून 2 लाख 74 हजार रुपयांच्या चोरीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
दोघेही अट्टल चोर
राम स्वरूप कुशवाहा आणि मिन्हज सिंधा हे दोघेही अट्टल चोर आहेत. कुशवाहाने मार्च 2023 मध्ये शाहरुखच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. कुशवाहा आणि सिंधा दोघेही अट्टल चोर आहेत. त्यांच्याविरुद्ध भरुचमध्ये चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.