धारावीच्या पिवळा बंगला परिसरात गुरुवारी रात्री गर्दुल्ल्याने धावत्या बसमध्ये ‘बेस्ट’च्या वाहकावर चाकूने सपासप वार करून जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. गर्दुल्ल्याने वाहकाकडील पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता विरोध झाल्याने हा हल्ला केला. यावेळी पैशाची बॅग मिळाली नसल्याने अखेर गर्दुल्ला वाहकाचा मोबाईल फोन घेऊन पसार झाला. मात्र पोलिसांनी काही वेळातच त्याच्या मुसक्या आवळल्या. या हल्ल्यात वाहक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालिकेच्या शीव रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
‘बेस्ट’ची विक्रोळी आगाराची मार्ग क्रमांक 7 वरील ही बस गुरुवारी रात्री 9.15 वाजता धारावीतील पिवळा बंगला येथे आली असता हा प्रकार घडला. बसमधील चोरट्याने बस वाहक अशोक डागळे (44) यांच्या खिशातून मोबाईल आणि रोख रकमेची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी डागळे यांनी गर्दुल्ल्याचा हात पकडून त्याला प्रतिकार केला. त्यावेळी चोराने डागळे यांच्याकर चाकूने हल्ला चढला. डागळे यांच्या विरोधामुळे गर्दुल्ल्याने त्यांच्या छातीवर तसेच पायाकर चाकूने सपासप वार केले. यात वाहक डागळे रक्तबंबाळ झाले. गर्दुल्ल्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला, मात्र पोलिसांनी त्याला काही वेळातच अटक केली. या घटनेत वाहक डागळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शीव रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अलिकडेच लालबाग येथे बेस्टच्या बस चालकाशी एका मद्यपी प्रकाशाने हुज्जत घालून चालकाला स्टेअरिंगवरून खेचण्याचा प्रयत्न केला होता. यात बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून एका महिलेचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना वाढल्याने चालक-वाहकाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कामगार सेनेकडून निषेध
शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी तातडीने शीव रुग्णालयात धाव घेत जखमी वाहकाची भेट घेऊन धीर दिला. शिवसेना आपल्या पाठीशी असून लागणारी सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच वाहकावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेधही केला. अकार्यक्षम गृह विभागाच्या कामगिरीमुळेच अशा प्रकारे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.