
घरी कुणीही नसल्याची संधी साधत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्याने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. तामिळनाडूमधील मग्नानापुरम परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे चोरी करून जाताना चोरट्याने एक चिट्ठी लिहून घरमालकाची माफी मागितली आहे. तसेच एका महिन्यात चोरी केलेला ऐवज परत करण्याचे आश्वासनही केले आहे. चोरट्याची ही चिट्ठी चर्चेचा विषय बनली आहे.
मग्नानापुरम परिसरात राहणारे सेल्विन हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सेल्विन आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाकडे चेन्नईला गेले होते. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. हीच संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात घुसून कपाटातील 60 हजार रुपयांची रोकड, 12 ग्रॅमची चैन आणि चांदीचे पैंजण लुटले. सकाळी सेल्विन यांचा नोकर घराची साफसफाई करायला आला असता चोरीची घटना उघडकीस आली.
नोकराने तात्काळ सेल्विन आणि पोलिसांना चोरीची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळाची पाहणी करत असताना पोलिसांना चोरट्याची चिट्ठी सापडली. या चिट्ठीत चोरट्याने चोरी केल्याबद्दल माफी मागितली. तसेच चोरी केलेले सामान एक महिन्यात परत करण्याचे आश्वासन दिले आहे. “मला माफ करा. मी हे एका महिन्यात परत करेन. माझ्या घरात कुणाची तरी प्रकृती ठीक नाही म्हणून मी हे करत आहे,” असे चोरट्याने पत्रात म्हटले आहे. याप्रकरणी मग्नानापुरम पोलिसांनी चोरीची तक्रार नोंदवली असून, पुढील तपास सुरू केला आहे.