मुंबईशी काडीचाही संबध नसलेल्यांना आपण मुंबई गिळायला देणार का? जागे व्हा! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचे दिसत आहे. मराठी असल्याचे एका तरुणाला नोकरी नाकरण्यात आली. एका दुकानदाराने महिलेला मारवाडीतच बोलावे लागेल, अशी दटावणी मराठमोळ्या गिरगावमध्ये केली. तसेच अनेक सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना प्रवेश नाकारला जातो. तसेच मुंबईत अनेक सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना घरे देण्यात येत नाहीत. अशा घटना सर्रास घडत आहे. तरीही आपण अजून गप्पच आहोत. जागे व्हा, अन्यथा महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र होईल, असा इशारा देत शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेत, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेला जागे होण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबईत मुंबईकरांना परवडतील अशी घरं मिळत नाहीत. मराठी माणसांना काही सोसायटींमध्ये प्रवेश बंद केला जातो.तर काही असे सत्ताधारी पक्षाचे मालक आहेत ज्यांना मुंबईच गिळंकृत करायची आहे. मुंबईचे भूखंड घश्यात घालायचेत, पण कर ही द्यायचा नाहीये आणि पैसेही द्यायचे नाहीयेत. थोड्या दिवसात, आपण आपल्यातच व्यस्त राहू आणि इथलं सरकार महाराष्ट्राचं नाव अदानीराष्ट्र करून टाकेल. मुंबईशी काडीचाही संबध नसलेल्यांना आपण मुंबई गिळायला देणार का? आपल्याला कधी जाग येणार? कधी चीड येणार? जागे व्हा!, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.