कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये झालेल्या फेरबदलांनंतर बृजभूषण शरण सिंह यांचे गुंड सक्रिय झाले असून ते गुंड माझ्या आईला धमकावत असल्याचा धक्कादायक दावा हिंदुस्थानची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने केला आहे. माध्यमांशी बोलत असताना साक्षी मलिकने बृजभूषण यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. ती म्हणाली, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बृजभूषण यांचे गुंड माझ्या आईला धमकी देण्यासाठी फोन करत आहेत. फोन करून सांगितले जात आहे की, तुमच्या घरात कोणावर तरी गुन्हा दाखल केला जाणार आहे. सोशल मीडियावरदेखील लोकं आम्हाला शिवीगाळ करत असल्याचा आरोपही साक्षीने केला आहे. आम्हाला नवीन महासंघाबाबत कोणतीही अडचण नाही. संजय सिंह या एकाच व्यक्तीच्या उपस्थितीमुळे अडचण निर्माण झाली होती. संजय सिंह यांच्याशिवाय आम्हाला नव्या महासंघासोबत किंवा अॅडहॉक समितीबाबतही काही हरकत नाही, असेही साक्षी म्हणाली.