आषाढी वारीमध्ये पाणी नाही; शिवसेनेचे नगर जिल्हा परिषद आवारात आंदोलन

नगर तालुक्यातील 42 गावांना पाणी पुरवठा करणारी बुऱ्हानगर पाणी पुरवठा योजना 18 जूनपासून बंद आहे. आषाढीची वारी सुरू असताना पाहुण्यांना जेवण नाही, पाणी नाही अशी स्थिती दिसत आहे. प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आले.

सध्या आषाढी वारी असल्याने नगर तालुक्यात जवळपास 60 ते 70 हजार वारकरी मुक्कामाला असतात. तसेच अनेकजण रस्त्याने जात आहेत. वारीसाठी जाणाऱ्यांना जेवण नाही तर कमीत कमी पिण्याचे पाणी देणे आवश्यक असते. मात्र, अनेक गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक गावात पाणीटंचाई आहे. गुरुवारी रात्री साकत,दहेगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी मुक्कामाला होती. त्यांना पिण्याचे पाणीही मिळाले नाही. त्यांमुळे वारकऱ्यांचे हाल झाले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

गावामध्ये क्षारयुक्त पाणी असल्याने त्याचा वापर करता येत नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध गावकऱ्यांनी केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरु होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले. आम्ही अनेकदिवसांपासून ही समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून नाईलाजाने आंदोलन करावे लागले, असे संदेश कार्ले यांनी सांगितले. आषाढी कार्तिकीची वारी आता सुरू आहे. या काळात पाणी पुरवढठ्याचे योग्य नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, इथल्या प्रशासनावर त्याचे काही देणे घेणे नाही किमान पाणी वारकऱ्यांना दिले पाहिजे ते सुद्धा देता आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे.