पंतप्रधान योजनेतील घरांकडे सर्वसामान्यांची पाठ; जाहिरातबाजी कामी येईना; 9875 पैकी केवळ 2200 सदनिकांची विक्री

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) उभारलेल्या घरांकडे सर्वसामान्यांनी पाठ फिरवली असून 9875 घरांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाला तीन महिन्यांत केवळ 2200 अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने लाखो रुपयांची उधळपट्टी करून लोकल, रेडिओ, सोशल मीडिया तसेच सार्वजनिक ठिकाणी स्टॉल लावून जाहिरातबाजी केली होती.

म्हाडाच्या कोकण मंडळाने विधानसभा निवडणुकीपूर्वी घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोळींज (विरार), खोणी (कल्याण), शिरढोण (कल्याण), गोठेघर (ठाणे) आणि भंडार्ली (ठाणे) येथे उभारलेल्या 9875 घरांचादेखील समावेश आहे. यातील सर्वाधिक घरे शिरढोण आणि खोणी येथे आहेत. पीएमएवायच्या घरांना अर्जदारांचा सुरुवातीपासूनच अल्प प्रतिसाद मिळाल्याने आचारसंहिता संपताच या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने ठिकठिकाणी जाहिरातबाजी केली होती. मात्र, ही जाहिरातबाजी सपशेल फेल ठरल्याचे दिसतेय.

म्हाडाची डोकेदुखी वाढली

पीएमएवायच्या घरासाठी पात्र होण्याकरिता सहा लाखांपेक्षा जास्त उत्त्पन्न नसावे तसेच देशभरात कुठेही पक्के घर नसावे या प्रमुख अटी आहेत. या अटींमुळेच या घरांना अर्जदारांचा अल्प प्रतिसाद मिळतोय, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या दोन्ही अटींत बसतील असे पात्र लाभार्थी तसेच त्यांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्था शोधणे हे म्हाडापुढे आता आव्हान असणार आहे. अन्यथा ही घरे धूळ खात पडण्याची शक्यता आहे.