जुनी पेन्शन योजना लागू  करण्याचा कोणताही विचार नाही; केंद्र सरकारच्या लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांची निराशा

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सभागृहात पहिलाच प्रश्न जुन्या पेन्शन योजनेबाबत विचारला. परंतु ही योजना लागू करण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट लेखी उत्तर देण्यात आले. त्यामुळे देशातील कोटय़वधी सरकारी कर्मचाऱ्यांची प्रचंड निराशा झाली असून राज्य सरकारी आणि केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांकडून येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एनडीए सरकारसाठी सत्तेचे पहिलेच वर्ष अत्यंत आव्हानात्मक असणार आहे

राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का, असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी संसद सभागृहात विचारला, मात्र केंद्र सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असे स्पष्ट उत्तर केंद्र सरकारने दिले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. या कर्मचारी संघटनांकडून सातत्याने सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात असून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवत संसद सभागृहात याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्याला केंद्र सरकारने नकार दर्शवला.