मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते, पण त्यांची नाराजी अद्याप कायम आहे. आज एका कार्यक्रमात ती उघड झाली. आयुष्यात काही क्षण धुपं येतं, पण ते कायमस्वरूपी नसतं असे सांगत मुनगंटीवार यांनी आपण पुन्हा येऊ, असे संकेत या कार्यक्रमात बोलताना दिले. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
चंद्रपुरातील घुग्घुस येथे सुधीर मुनगंटीवार व अन्य दोन आमदारांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. आम्हाला सत्तेची भूक नाही. आम्हाला विकासाची भूक आहे. पदाचीही भूक नाही. पदाची चिंता आपण कधीच केली नाही, असे मुनगंटीवार त्यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘मी मुंबईतून नागपूरसाठी सकाळी विमानात बसलो, मात्र अचानक काय झालं की मी नागपूरला उतरू शकलो नाही आणि विमानही उतरू शकलं नाही. कारण नागपूरमध्ये एवढं धुपं जमा झालं की, ते विमान नागपूरला न उतरता विमानाचा पायलट थेट हैदराबादला घेऊन गेला. मग आमचं विमान हैदराबादला उतरलं. एक तासाने मेसेज आला की नागपूरचं धुपं संपलं, तेव्हा विमान पुन्हा नागपूरला आलं. जीवनाचंही असंच असतं. काही क्षण धुपं येतं, पण ते धुपं कायमस्वरूपी नसतं. पुन्हा आपलं विमान उतरणार हे मात्र निश्चित असतं.’