राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार दहिसरमधून विनोद घोसाळकर, विलेपार्लेतून माजी नगरसेवक संदीप नाईक, वर्सोव्यातून हरुन खान आणि घाटकोपर पश्चिमेतून संजय भालेराव यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. पहिल्या यादीत 65, दुसऱ्या यादीत 15 तर तिसऱ्या यादीत आज चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 84 उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला राज्यात प्रचंड पाठिंबा मिळत असताना तिन्ही पक्षांना प्रत्येकी 90 जागांचे वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.