मास्टर कीने दुचाकींची चोरी, चार सुझुकी एक्सेस केल्या हस्तगत

मास्टर कीचा वापर करून सुझुकी एक्सेस या दुचाकी चोरणारा चोरटा ऍण्टॉप हिल पोलिसांच्या हाती लागला आहे. एका गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याला पकडून पोलिसांनी चोरीच्या चार सुझुकी एक्सेस हस्तगत केल्या आहेत.

सरदार नाग 1 येथील बमक कॉलनीत पार्क केलेली सुझुकी एक्सेस 125 ही दुचाकी चोरीला गेली होती. गाडी मालकाने तशी तक्रार दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी मदने घुगे, आंधळे, टेळे, आमदे, विसपुते, किरतकर, सजगने या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळापासून चोरटा ज्या मार्गाने गेला तेथील 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पण दादरच्या कबुतरखाना येथून तो कुठे गेला ते काही समजू शकले नाही. त्यामुळे पथकाने चोरटा घटनास्थळी आला त्या मार्गावरील म्हणजे उलटा तपास सुरू केला. तेव्हा एके ठिकाणी तो कॅमेऱयात सापडला. मग त्या आधारे खोबऱयाच्या मार्फत माहिती काढली असता त्या चोराचे नाव अंबादास शिंदे (25) असे असून तो कोकणी आगार येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्या परिसरात सापळा रचून मदने व पथकाने त्याला उचलले. चौकशीत त्याने एकूण चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अंबादास हा मजुरीचे काम करतो. पण त्याचबरोबर त्याने दुचाकीदेखील चोरल्या होत्या.