मेहकरात दिवसाढवळ्या चोरी, 13 लाख 54 हजाराचा मुद्देमाल लंपास

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात शिवाजी नगर मध्ये मंगळवारी 18 रोजी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने व नगदी रुपयासह एकूण 13 लाख 54 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.

शिवाजी नगर मध्ये ऋषीकेश नंदकिशोर रहाटे हे राहतात. 18 फेब्रुवारीला फिर्यादी ऋषीकेश रहाटे व साक्षीदार हे कामानिमित्त बाहेर गावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे समोरील दरवाजाचे कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने सोन्याचा चपला हार वजन 6 तोळे किंमत अंदाजे 3 लाख,सोन्याचे मंगळसूत्र वजन 6 तोळे किंमत 3 लाख,सोन्याचे तुशी वजन 2 तोळे किंमत 1 लाख,सोन्याच्या पाटल्या वजन 5 तोळे किंमत 2 लाख 50 हजार, सोन्याचे दोन गोफ वजन 2.7 तोळे किंमत 1 लाख 35 हजार, तीन जेन्ट्स अंगठ्या वजन 3 तोळे किंमत 1 लाख 50 हजार, दोन लेडीज अंगठ्या वजन प्रत्येकी 6 ग्रँम किंमत 60 हजार, कानातले वेल वजन 1 तोळे किंमत 50 हजार असे एकूण सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 13 लाख 45 हजार व नगदी 9 हजार असा एकूण 13 लाख 54 हजाराचा मुद्दे माल चोरून नेला आहे. ऋषीकेश नंदकिशोर रहाटे यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पोलिसांनी श्वान पथक व फिंगर प्रिंट टीमला सुद्धा पाचारण केले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे तपास करत आहेत.