राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा आता शिल्पकार राम सुतार साकारणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला सिंधुदुर्ग जिह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला होता. ऑगस्टमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर देशासह जगभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या दुर्घटनेला चार महिने उलटल्यानंतर आता राज्य सरकारने या ठिकाणी 60 फुटांचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा.लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम केले होते.

राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गार्नेट इंटिरियर्स आणि राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा.लि. या दोन कंपन्यांनी पुतळ्याच्या कामासाठी निविदा दाखल केली होती. इतर बोलीदारांच्या कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या पंपनीला 20.95 कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे. हे काम त्यांना सहा महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे.

मजबूत पुतळा उभारण्यासाठी तज्ञांची मदत

नव्याने उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याची उंची 60 फूट इतकी असणार आहे. तर पुतळा पेलण्यासाठी 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. पुतळा उभारण्यापूर्वी 3 फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी, मुंबई आणि अनुभवी पंत्राटदार पंपनीला दिला आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा यासाठी तज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.