एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगाराच्या बसेसच्या फेऱया टप्प्याटप्प्याने पुढील दोन महिन्यांसाठी परळ, दादर व कुर्ला नेहरू नगर बस स्थानकातून होणार आहेत. मात्र मुंबई आगाराच्या फेऱ्या याच बस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील 183 बस स्थानकांच्या परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल आगारातील सुमारे 1900 चौरस मीटर इतक्या परिसराचे पूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 64 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बस स्थानक परिसरात खड्डे पडणे, पाणी साचणे, धूळ उडणे अशा समस्या बंद होणार आहेत.